गेल्या काही वर्षांपासून अक्षय कुमारने अस्सल सिनेमांचा धडाका लावला आहे. अस्सल अशासाठी की या सिनेमांमध्ये सामाजिक संदेश असतोच. पण त्याही पलिकडे यात मनोरंजनमूल्य ठासून भरलेलं असतं. पॅडमॅन, टॉयलेट, एअरलिफ्ट, बेबी, जॉली एलएलबी २ ही त्याची काही पटकन तोंडावर येणारी नावं. आता तो आपल्यासमोर 'गोल्ड' हा सिनेमा घेऊन येतोय. सिनेमाची गोष्ट प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशीच आहे. त्यात त्यातली मुख्य भूमिका अक्षयच्या वाट्याला आली आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं की हा सिनेमा रीमा कागतीचा आहे. रीमाने फरहान अख्तर, झोया अख्तरसोबत अनेक सिनेमांना साह्य केलं आहे. शिवाय हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेडही तिचा. तर अशी दिग्दर्शिका
'गोल्ड'सारख्या विषयात हात घालताना अक्षयला सोबत घेते तेव्हा, हा सिनेमा काहीतरी भन्नाट अनुभव देणार असं वाटतं. निदान तशी अपेक्षा असते. 'गोल्ड'चं कथानक कमाल आहे. त्याची पटकथा रचताना मात्र त्यात जरा गडबड झाली आहे. म्हणजे, असं की 1936 मध्ये जर्मनीत ऑलिम्पिक झालं होतं. त्यावेळी भारतीय संघाने सुवर्ण पदक मिळवलं. पण ते ब्रिटिशांकडून खेळले. त्यावेळी तिथे ब्रिटिश झेंड्याऐवजी आपला झेंडा म्हणजे, स्वतंत्र भारताचा झेंडा तिथे फडकायला हवा होता असं काहींना वाटून गेलं. त्यातले एक तपन दास. तपन त्यावेळी त्या संघाचे मॅनेजर होते. पुढे दुसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला. त्यामुळे तीन ऑलिम्पिक रद्द झाली आणि जाहीर झालं 1948 चं ऑलिम्पिक, जे इंग्लंडमध्ये होणार होतं. या स्पर्धेत स्वतंत्र भारताचा संघ उतरवण्याचं स्वप्न तपन पाहतात. टीम गोळा करतात आणि मग पुढे काय होतं ते आपल्या सगळ्यांना माहित आहेच. तो इतिहासच आहे.
ही गोष्ट खरंच कमाल आहे. या निमित्ताने तपन यांच्या तपश्चर्येची, त्यावेळच्या खेळाडूंच्या जिगरी खेळाची आठवण आपल्या सर्व भारतीयांना होईल. पण आता त्या पलिकडे आपण पटकथेचा विचार करतो. त्यावेळी मात्र बऱ्याच त्रुटी यात दिसतात. पहिली सगळ्यात मोठी उणीव अशी की तो सिनेमा त्या काळातला वाटत नाही. तो सतत आजच्या काळाचा चकचकीतपणा दाखवत राहतो. यातली गाणी सगळी आजच्या काळातली वाटतात. त्याला किमान एक रेट्रो साऊंड हवा होता तो इथं नाही. अनेक प्रसंग यात ओढून ताणून, विनोद निर्मिती करायची म्हणून यात आणलेत की काय असं वाटत राहतं. उदाहरणार्थ, उत्तरार्धातली हॉकी फेडरेशनमधली ठसन, तपनला बेअब्रू करण्यासाठी घातला जाणारा घाट हा सगळ्या बनावट वाटतो. ब्रिटनमध्ये ऑलिम्पिक खेळायला गेल्यानंतर अशी कूटनिती तीही 1948 साली वापरलेली ही उगाच घेतलेली सिनेमॅटिक लिबर्टी वाटते. अक्षय कुमारचा तपन दिसायला छान आहे. पण त्यानेही उगाच नको तिथे विनोद निर्मिती केली आहे. म्हणजे, हॉकी फेडरेशनचे लोक त्याला भेटायला आल्यावर तपन त्याचं गुणगान गाऊ लागतो. यावर ते म्हणतात, बस बस.. अब जादा मस्का मत लगाओ. यावर तपन म्हणतो, आप क्या ब्रेड है, आपको मस्का लगाऊ.. हे असे डायलॉग आपल्याला मराठी विनोदी कार्यक्रमांची आठवण करुन देतात. उत्तरार्धातलं पियक्कड गाणंही उगाच घेतलेलं असं वाटत राहतं. अक्षयने गेल्या काही काळात दिलेल्या सिनेमांची यादी पाहिली तर त्याच्या सिनेमात, लॉजिकही असतं आणि त्यात रंजनही असतं. विशेषत: गेल्या काही काळात आलेले त्याचे सिनेमे हे सत्य घटनांवर बेतलेले होतेच, शिवाय, त्यात योग्य ठिकाणी सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली दिसली. इथे मात्र तसं होतं नाही. इथे सोयीनुरुप घेतलेली लिबर्टी सतत दिसत राहते.
एक नक्की यात कामं मात्र सगळ्यांनीच मस्त केली आहेत. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो, अमित साध, सनी कौशल, विनितकुमार यांचा. यांच्यासह सगळ्याच टीमने चोख काम केलं आहे. सिनेमाची गोष्ट सिनेमापेक्षा सरस असल्यामुळे सिनेमा कौतुकास्पद ठरतो. याची पटकथा आणखी कसून बांधायला हवी होती असं वाटून जातं. एकूणात भारतीय संघाने बजावलेलं हे कर्तृत्व पाहायला हरकत नाही. परंतु या सिनेमाची पटकथा आणखी कसून बांधली असती तर या 'गोल्ड'ची झळाळी आणखी वाढली असती यात शंका नाही. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला देतोय, अडीच स्टार.
from movies https://ift.tt/2vKcTVH