एकतर सुबोध भावे आणि मोहन जोशी असे दोन गुणी अभिनेते बऱ्याच दिवसांनी एका सिनेमात दिसतायत ही एक बाजू. आणि लेखनाचं अंग असलेल्या वैभव चिंचाळकर यांनी या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण केल्याने, आता त्यांच्या कामगिरीकडे असलेलं लक्ष हे त्याचं दुसरं कारण. या सिनेमाची गोष्ट तशी लहान आहे. पण सिनेमा करताना त्यातली पटकथा मोठी केल्यामुळे हा सिनेमा कमालीचा लांबतो. त्यामुळे तो कंटाळवाणा होतो. तात्या जळगावला राहतात. गावात कीर्तनकार म्हणून त्यांचा लौकीक. कीर्तनातून तुकारामाची गोष्ट सांगता सांगता त्यांना तुकोबांना न्यायला आलेल्या पुष्पक विमानाचं भारी अप्रूप आहे.
त्यांचा एकुलता एक नातू विलास मुंबईला असतो. त्याचं लग्न झालंय. पण बरीच वर्षं तो जळगावला आलेला नाही. तो तात्यांना सतत मुंबईला बोलावतोय. पण तात्या तिकडे जायला काही तयार नाहीत. एक दिवस काही कारणाने तात्या पडतात आणि विलास जळगावला येतो. त्यांच्याशी बोलून विलास त्यांना मुंबईला आणतो. गावात ऐसपैस राहिलेल्या तात्यांना मुंबई अडचणीची वाटू लागते. तरी कसेबसे काही दिवस काढून तात्या जळगावला जायचा हट्ट धरतात. अन त्याचवेळी त्यांच्या डोक्यावरून विमान उडतं. त्याला पाहून तात्या विस्मयचकीत होतात. विलास त्यांना या विमानात बसवायचं मान्य करतो आणि आपण पुष्पकमध्ये बसणार याची कल्पना तात्यांनी सुखावते. मग हा प्रवास नेमका कसा घडतो त्याची ही गोष्ट. सिनेमातले संवाद मनात घर करतात. उदाहरण द्यायचं तर ट्रेलरमध्ये असलेल्या आजोबा नातवाच्या नात्याचं देता येईल. आजोबासाठी नातू म्हणजे आयुष्याचा शेवट. तर नातवासाठी आजोबा म्हणजे सुरूवात, हा संवाद कमाल आहे.
आयुष्य वाढतं तसं आत्मा स्वाभिमानी होतो आणि शरीर परावलंबी हा संवादही महत्वाचा. विमानाला पाहून तात्यांचा हा कुठला पक्षी असं विचारणंही कन्व्हिंन्सिंग पाटत नाही. यातले संवाद सोपे सहज असले तरी पटकथा लिहिताना मात्र ती लांबली आहे. पहिल्या भागात व्यक्तिरेखा उभ्या राहतात. पण त्या पलिकडे इथे फार काही घडत नाही. तर दुसऱ्या भागात गाणी जरा जास्त झाली आहेत. त्यातलं शौनक अभिषेकी आणि जयतीर्थ मेवुंडी यांनी गायलेलं गाणं सुरेख जमून आलंय. पण त्यातलं मुंबईचं गाणं मात्र ऐकायला बरं वाटतं. पण त्याचं चित्रिकरण रूचत नाही. गाण्यात सतत आजुबाजूच्यांना नाचवणं रम्य वाटत नाही. शिवाय, तात्यांना असलेला मामुला आजार विलास त्यांना का सांगत नाही तेही कळत नाही. त्यामुळे पुढे घडणाऱ्या मेलोड्रामावर प्रश्न निर्माण होतो. तसाच शेवटही घाईघाईचा झालेला. या सिनेमातले अनेक प्रसंग आपण यापूर्वी इतर सिनेमात पाहिलेत असं वाटून जातं.
विशेषत: विलास आणि फिरोज यांच्यातले संवाद. या प्रकारामुळे सिनेमा कमालीचा लांबला आहे. दोन तासांचा हा सिनेमा साधारण ९० मिनिंटांत संपवला असता तर धमाल आली असती असं वाटून जातं. एक नक्की यात कमाल केली आहे ती मोहन जोशी यांनी. त्यांचा तात्या अफलातून आहे. त्यांच्यामुळे यातले संवाद आणखी जिवंत होतात आणि सिनेमा खिळवून ठेवतो. अतिशय सहज अभिनय ही त्यांची जमेची बाजू. गावात असताना त्यांचं विसराळू असणं.. विलाससाठी केलेला आटापिटा कमाल आहे. त्यावेळी मुंबईत आल्यानंतर डोळे दिपवून टाकणारे अनुभव दाखवणंही तितकंच कमाल. सुबोधनेही आपल्या भूमिकेची मर्यादा ओळखून काम केल आहे. राहुल देशपांडे यांची भूमिका छोटी असली तरी तिथे चांगला अभिनेता हवा होता का असं वाटून जातं. गौरी किरण ही नवी नायिका पडद्यावर पदार्पण करते आहे. तिची भूमिका छोटी असली तरी तिने ती नेटकी वठवली आहे. एकूणात, हा सिनेमा लांबल्यामुळे काहीसा कंटाळवाणा होऊ लागतो. तो जरा कसून बांधला असता तर धमाल आली असती हे नक्की. म्हणूनच पिक्चर बिक्चरमध्ये आपण या सिनेमाला देतो आहोत दोन स्टार. पण.. मोहन जोशी यांच्या अभिनयाने यावर अर्धा स्टार मिळवला आहे.
म्हणूनच सिनेमाला एकूणात मिळतात अडीच स्टार.
from movies https://ift.tt/2vaU5P7