Full width home advertisement

Post Page Advertisement [Top]

1

काही चित्रपटविषयक नियम - भाग १ 
लिहायच्या वेळेस आम्हाला खरे म्हणजे आणखी नियम जाणवतील/सुचतील असे वाटले नव्हते (जरी आम्ही आणखी लिहू असे आश्वासन लेखाच्या शेवटी दिले असले तरी). नाहीतर मॉन्स्टर मूव्हीज च्या पहिल्या भागाच्या शेवटी ती मोठी मगर, डायनोसोर, अजगर वगैरे मारल्यावर जगातले सर्व मॉन्स्टर्स संपले असे गृहीत धरून सगळे लोक काहीतरी स्मार्ट डॉयलॉग्ज मारून तेथून निघून गेल्यावर मग तेथे पुन्हा एखादे अंडे फुटताना किंवा काहीतरी वळवळताना दिसते, तसे आम्ही पहिल्या नियमांच्या शेवटी काहीतरी सिम्बॉलिक ठेवले असते. निदान एखादी हलती स्माईली. पण असो.

हे वाचायच्या आधी पहिला भाग जरूर वाचा. प्रतिक्रियांमधे हे क्रमा़ंक तेरा पासून का चालू केले असे विचारलेत तर आपण पहिला भाग वाचला नाही हे चाणाक्ष लेखक नक्की ओळखतील.

तर हा घ्या नियमांचा नवीन ष्टॉकः

१३: पाच मिनीटांचा नियम.
खालील गोष्टीतील एक गोष्ट/थीम जर सिनेमात असेल तर दुसरी पाच मिनीटांत येतेच येते:

१३.१> कॉलेज तरूणांवरची कथा: (सुरू झाल्यावर ५ मिनीटांत) "इस साल के डान्स कंपिटिशन मे...." हा संवाद. शक्यतो आत फुल व वरती चौकटीचा हाफ शर्ट घातलेल्या व जन्मापासून "अच्छे दोस्त"च असलेल्या तरूणाला.

१३.२> हीरो ने कोणालातरी बहीण मानलेय किंवा त्याला एक बहीण आहे हे आपल्याला कळलेय - ते - रक्षाबंधन येण्याचा काळ

१३.३> हीरो किंवा साईडहीरो हा मुस्लिम आहे हे कळल्यावर - ते - तो नमाज अदा करतानाचा शॉट

१३.४> हीरो एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे हे कळते - ते - "आज बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग आहे" हा संवाद

१३.५> किंवा तो सेल्स मधे आहे हे कळल्यावर - तो एक डावीकडून उजवीकडे वर जाणार ग्राफ असलेला सेल्स प्रेझेंटेशन चा शॉट

१४.काही विशिष्ट गोष्टी करणारे लोक त्या करताना दारे व्यवस्थित बंद करून करत नाहीत. पण पूर्ण उघडीही ठेवत नाहीत. किंचित किलकिले असते. त्याच दिवशी काहीतरी पराक्रम करून आलेला हीरो किंवा हीरॉइन दार उघडायचा प्रयत्न करते तर ते उघडेच असते. मग तो आत गेल्यावर अस्पष्ट आवाज येतात. पुढे जे होते त्यातून चित्रपटाची कथा तयार होते.
तसेच हे लोक खिडकीत असतील तर त्यांच्या सावल्या खिडकीतील काचेवर काय चालले आहे याची अचूक कल्पना बाहेरून येइल अशाच पडतात. खिडकी उघडी असेल तर बाहेरून कोठूनही क्लिअर दिसेल अशा ठिकाणीच हे चाललेले असते.

१५:हीरॉईन किंवा कोणीही मुलगी झोपलेली आहे. अशा स्थितीत तेथे जागा असलेला तरूण जर अच्छा दोस्त असेल तर तो आपले पवित्र हेतू दर्शवण्याकरिता भर मुंबईत भर उन्हाळ्यात सुद्धा तिच्या अंगावर पांघरूण घालून तेथून जातो.

१६. नॅरो एस्केप रूल:
डायनोसॉर, मॉन्स्टर्स, भुते, पाण्याच्या लाटा, आगीचे लोळ यापासून पळणारे जर "मेन कलाकार" असतील तर ते नेहमी एक दोन इंचांच्या किंवा सेकंदांच्या फरकाने वाचतात. त्यापेक्षा जास्त किंवा कमी नाही. बंद खोल्यांची, लिफ्टची, दारे/शटर्स बंद होता होता त्यातून निसटतात. पूर असेल तर "पानी सरके उपर" होता होता एखादी व्हाल्व उघडते. आगीचे लोळ भुयारातून वर जाण्याआधी एक सेकंद हे लोक तेथून खाली पडतात व त्यांच्या सोयीसाठी खाली पाणीही असते.

तसेच हे सहकलाकार असतील तर ते आपण घाबरून किंवा फाजील आत्मविश्वासाने हसून ज्या दिशेला बघत आहोत त्याच्यापेक्षा वेगळ्या दिशेने हल्ला होउ शकतो याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असतात.

१७.हीरो व हीरॉईन दोघेही पळालेले असतील व ते एरव्ही सुद्धा क्वचित घरी जेवणारे असतील तरीही ते पळून येउन लपलेल्या जागी मात्र त्यांना एकदम लाकडे तोडून आणून दगडांची चूल करून त्यावर स्वयंपाक करावा लागतो. त्यासाठी तवा वगैरे भांडीही अचानक उपलब्ध होतात. जवळच्या गावात सामान आणायला जाता येते पण एखाद्या हॉटेलातून थेट काहीतरी खायला आणायचा पर्याय नसतो.

१८.घरातून असे पळालेले लोक एखाद्या पानाच्या टपरीवर, चहाच्या हॉटेल मधे किंवा दुकानात काहीतरी आणायला जातात. तेव्हा तेथे पेपर उघडून बसलेल्या एखाद्या माणसाच्या अगदी समोरच्या पानावर अर्ध्या पानाच्या साईजएवढा त्या पळालेल्या व्यक्तीचा फोटो हेडलाईन सकट आलेला असतो. पान सुद्धा पलटावे लागत नाही.

१९. खालील नावे असलेले लोक कधीही वाईट नसतातः
१. मास्टरजी
२. खान चाचा
३. मिसेस ब्रिगॅन्झा

२०.जेव्हा दोन हीरोंचे एकाच हीरॉईन वर प्रेम असते ते तिघेही एकमेकांना ओळखत असले तरी तिचे नाव किंवा जरा क्लू लावता येइल अशी इतर काहीही माहिती एकमेकांना देत नाहीत. चित्रपटात असंख्य एकत्र शॉट्स असले तरी तेव्हा "अरे हीच ती" असेही सांगत नाहीत. पूर्ण चित्रपटात तिच्याशिवाय दुसरी कोणीही मुलगी नसली तरी दोघांनाही तीच ती असेल याचीही शंका येत नाही. मग पूर्ण चित्रपटभर सगळा गोंधळ झाल्यावर कधीतरी ते उघडकीस येते. मग ते जबरी दोस्त असल्याने ज्याला आधी कळते त्याला मरणे किंवा स्वतःला तिच्या नजरेत बदनाम करणे हे दोनच पर्याय असतात.

२१.हिन्दीतील हीरो कोणत्याही आर्थिक स्तरावर असेल तरी त्याच्या देशा-परदेशातील गाड्या लक्झरी ब्रॅण्डच्याच असतात. त्या नेहमी थांबताना स्क्रीनवर तो लोगो मोठ्ठा दिसेल अशाच थांबतात. इतर देशांतील कडक ट्रॅफिक नियम- लेन पाळणे, सीट बेल्ट लावणे- केवळ या लोकांसाठी शिथील केलेले असतात.

तोच हीरो हॉलीवूडचा असेल तर त्याच्या कारचा ब्रॅण्ड हे एक 'स्टेटमेंट' असते तो हीरो कसा आहे त्याचे. Show him driving a Camry, a Taurus or an F150 and move on? चान्सच नाही. तो कारमधे बसल्यावर रेडिओवर जे गाणे लागते ते ही रॅण्डम नसते, त्याच्या खास आवडीचेच असते आणि त्या गाण्याचा संदर्भ पुढे कथेत येतोच येतो.

२२.
वन वे रस्त्यावरून उलट्या दिशेने गाडी घातली की स्टिअरिंग एकदा थोडेसे इकडे व एकदा तिकडे फिरवत रस्त्याच्या मधून चालवत सर्व येणार्‍या गाड्या चुकवत जाता येते.

२३.
क्लोज मॅच. हीरो बॅटिंग करतोय. शेवटच्या बॉलवर सहा हवे आहेत. अशा वेळेस दुसर्‍या टीमचा कॅप्टन सगळे फिल्डर्स इतके "आत" लावतो की बाउन्ड्रीच्या जवळ उडालेला कॅच घ्यायला त्यांना मागे मागे पळत जावे लागते.

२४. अॅडव्हेंचर चित्रपटात कोणीही पाण्यात पडून वाहून जाऊ लागले किंवा होडीत्/तराफ्यात बसून जाऊ लागले की लगेच धबधबा समोर येतो.

२५. जरा फॅशनेबल असलेली हीरॉईन जेव्हा हीरोच्या घरी पहिल्यांदा जाते तेव्हा भावी सासूबरोबर किचनमधे तिला नेहमी ऑम्लेटच बनवावे लागते व तिला ते येत नसते, एवढेच नव्हे तर "अंडी सुरक्षितरीत्या कशी हाताळावीत" याचेही तिला सामान्यज्ञान नसते.

२६. हीरोच्या जगण्यामरण्याचे नियम. जुन्या माबोवर होते पण आता ते सापडत नाहीत म्हणून येथे "समग्र सूची" करण्याकरिता पुन्हा, व सुधारित आवृत्ती:

बॅकग्राउंडः हीरोला गोळी लागली आहे किंवा तो पाण्यात पडला किंवा "इन जनरल" गायब झाला आहे.

1 दंडात गोळी: नक्की वाचतो, एवढेच नाही तर त्यावर काही इलाजही करावा लागत नाही. फक्त एक रूमाल बांधून जणू मुंगी चावली आहे इतक्या सहजतेने फक्त तेथे हात धरून तो उरलेले संवाद म्हणतो.

2 डोक्यात किंवा छातीत गोळी: हिरॉईन जिवंत आहे का यावर ते ठरते.

2a हिरॉईन आधी मेलेली: मग हा ही मरतो. एरव्ही चिवट असला तरी शेवटी अगदी कोठेतरी "आ बैल" करून मरतो.

2b हिरॉईन अजून जिवंत्: मग बहुधा वाचतो आणि शेवटच्या शॉट मधे हॉस्पिटल मधे बँडेज च्या भेंडोळ्यात रोमँटिक संवाद म्हणतो.

2c तसेच याला मारून इतर कोणी कोणाबरोबर लग्न करावे हा प्रश्न सुटणार आहे: नक्कीच मरतो, डायरेक्ट गोळीने मेला नाही तर ज्याच्या लग्नाचा प्रश्न सुटणार आहे त्याला व्हिलन गोळी घालत असताना "नहीSSSS" म्हणून मधे कडमडतो.

3 सुरूवातीचे रोमँटिक गाणे झाल्यानंतर पुढे नदीत पडणे किंवा अपघात होणे पण पुढे काय झाले ते न दाखवणे: नक्कीच वाचतो आणि नंतर परत येतो

3a यात चित्रपट emotional, "this movie is about relationships" वगैरे असेल तर तो नदीत पडला किंवा अपघात झाला म्हणजे मेलाच असे गृहीत धरून नायिका दुसरे लग्न करते, आणि ते जरा सेटल होत आहेत म्हणेपर्यंत हा तेथे कडमडतो. तिच्या पार्टीत एक ग्लास हातात धरून तिच्या बेवफाईबद्दल तो वाचल्याचा आपल्याला पश्चात्ताप होईल एवढी एक बोअर गझल गातो, ते गाणे कशाबद्द्ल आहे हे उपस्थितांपैकी इतरांना तर सोडाच पण दुसर्‍या नवर्‍यालाही कळत नाही. मग दोन्हीपैकी कोणते लग्न जास्त पुढच्या स्टेज ला गेलेले आहे त्यावर हा की तो मरतो ते ठरते.

4 कोठेही गोळी, पण अजून व्हिलन जिवंत आहे, थोडा बदला बाकी आहे आणि तो घेणारे अजून कोणी शिल्लक नाही: नक्कीच वाचतो आणि बरा व्हायच्या आधीच सलाईनसकट हॉस्पिटल मधून धावत सुटतो आणि व्हिलन ला "त्यापेक्षा हा ठीक असताना याच्याशी मारामारी परवडली" असे वाटावे इतका बडवतो.

5a चित्रपटाच्या शेवटी मेला: पर्मनंट मरतो.
5b चित्रपटाच्या मधेच मेला अशी शंका: नक्कीच नंतर उगवतो.
5c चित्रपटाच्या मधेच मेला आणि जाळलेला किंवा पुरलेला दाखवला: नक्कीच डबल रोल असतो.



5d चित्रपटाच्या क्लायमॅक्स मधे काहीतरी चांगले काम करताना मेला: उर्वरित लोक शेवटच्या शॉट्ला त्याच्या पुतळ्याला वंदन वगैरे करतात.

Bottom Ad [Post Page]