मुंबई :ऐश्वर्या राय-बच्चन, अनिल कपूर आणि राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेला 'फन्ने खान' या चित्रपटावरुन वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. 'मेरे अच्छे दिन कब आयेंगे' या गाण्यावरुन उठलेला धुरळा शांत करण्यासाठी 'मेरे अच्छे दिन है आये रे' हे गाणं रिलीज करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
2014 च्या लोकसभा निवडणुकीसाठी 'अच्छे दिन आयेंगे' हे भाजपचं स्लोगन होतं. याच घोषवाक्याशी मिळतं-जुळतं असलेल्या 'मेरे अच्छे दिन कब आयेंगे' या फन्ने खानमधील गाण्यामुळे सोशल मीडियावर वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर राजकीय दबावाखाली 'मेरे अच्छे दिन है आये रे' हे गाणं रिलीज केल्याचं म्हटलं जात आहे. हे गाणं रिलीज झाल्यावर मोदी सरकारविरोधात सोशल मीडियावर टीका व्हायला लागली. राजकीय दबावामुळे हे मूळ गाणंच सिनेमातून काढून टाकलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इरशाद कामिल यांनी हे गाणं लिहिलं आहे. अमित त्रिवेदींनी हे गाणं गायलं असून त्यांनीच संगीतबद्धही केलं आहे. गरज नसताना गाण्याला राजकीय रंग दिल्यामुळे नवीन गाणं प्रदर्शित करावं लागल्याचं 'फन्ने खान'चे दिग्दर्शक अतुल मांजरेकर सांगतात. अनिल कपूरने सिनेमात टॅक्सीचालकाची भूमिका साकारली आहे. अनेक अडचणींवर मात करत आपल्या मुलीला मोठी गायिका बनवण्याचं स्वप्न तो पाहतो. त्यावेळी 'अच्छे दिन कब आयेंगे' हे गाणं सिनेमात येतं, असं अतुल मांजरेकर सांगतात. फन्ने खान हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र चित्रपट निर्माते वाशू भगनानी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन सिनेमाच्या रिलीजला स्थगिती आणण्याची मागणी केली आहे.
चित्रपटाच्या भारतातील वितरण हक्कावरुन प्रॉडक्शन कंपनीसोबत वाद झाल्याची माहिती आहे.
from movies https://ift.tt/2mXKy9F