मुंबई :बॉलिवूडची 'ट्रॅजेडी क्वीन' अर्थात दिवंगत अभिनेत्री मीना कुमारी यांची आज 85 वी जयंती आहे. हे निमित्त साधत इंटरनेट जगतातील जायंट मानल्या जाणाऱ्या गूगल सर्च इंजिनने आपल्या होमपेजवर डूडलद्वारे मीना कुमारी यांना अभिवादन केले आहे. गूगलच्या डूडलद्वारे नेहमीच दिग्गजांच्या आठवणींना उजाळा दिला जातो. 1 ऑगस्ट 1932 रोजी मीना कुमारी यांचा जन्म झाला. महजबीन बेगम असे मीना कुमारी यांचे मूळ नाव. 30 वर्षांच्या सिने-कारकीर्दीत मीना कुमारी यांनी 90 हून अधिक सिनेमांमध्ये काम केले. त्यांचे अनेक सिनेमे आजही 'क्लासिक' म्हणून गणले जातात. मीना कुमारी यांच्या वाट्याला अनेक शोकात्म भूमिका आल्या. त्यांचे सिनेमे पाहताना प्रेक्षकही रडत असत, असे सांगितले जाते. म्हणूनच मीना कुमारी यांना 'ट्रॅजेडी क्वीन' म्हटलं जातं. मीना कुमारी यांचं वैयक्तिक आयुष्यही अत्यंत चढ-उतराचं होतं. 1962 मध्ये 'साहिब, बिवी और गुलाम' सिनेमात मीना कुमारी यांनी 'छोटी बहू'ची भूमिका साकारली होती. या भूमिकेसारखंच मीना कुमारी खऱ्या आयुष्यातही व्यसनाच्या आहारी गेल्या होत्या. अयशस्वी संसार, वडिलही दारुच्या व्यसनी जाणं इत्यादी गोष्टींमुळे मीना कुमारी पार खचल्या होत्या. मीना कुमारी यांची सिनेमा क्षेत्रातील कारकीर्द गाजली. त्यांनी अनेक लोकप्रिय, आशयपूर्ण सिनेमे केले, प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या, मात्र जन्मावेळी जी गरिबी मीना कुमारी यांच्या घरात होती, तिच गरिबी त्यांच्या शेवटच्या काळात सुद्धा होती. 31 मार्च 1972 रोजी एका नर्सिंग होममध्ये यकृताच्या आजारामुळे मीना कुमारी यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलचे पैसे भरण्यासाठीही त्यांच्या कुटुंबीयांकडे पैसे नव्हते.
from movies https://ift.tt/2NZQ7Qd