चित्रपट: अश्लील उद्योग मित्रमंडळ
निर्मिती: गौरी आणि बनी दालमिया, सुरेश देशमाने आणि विनोद सातव
दिग्दर्शन: आलोक राजवाडे
लेखन: धर्मकीर्ती सुमंत
स्टार कास्ट: अभय महाजन, पर्ण पेठे, सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, विराट मडके, अमेय वाघ आणि सई ताम्हणकर
व्ह्यूपॉइंट: ‘अश्लील उद्योग मित्रमंडळ’ या नावावर जाऊन जर तुम्ही अलीकडे आलेल्या मराठीतल्या काही प्रसिद्ध अडल्ट कॉमेडी सिनेमांसारखा हा हि एक सिनेमा असावा असं समजून हा सिनेमा पाहायला गेलात तर नक्कीच तुमची निराशा होऊ शकते. मात्र मराठीत नवे प्रयोग करणारे सिनेमे क्वचितच प्रदर्शित होत असतात, आणि अशा सिनेमांबद्दल तुम्हाला कुतूहल असेल तर हा सिनेमा नक्कीच पाहायला हवा!
काय जमून आलंय?
- सिनेमा सुरु झाल्याच्या १० मिनिटातच सिनेमा कुठल्या वाटेने जाणार आहे हे प्रामाणिकपणे जाहीर करतो. हि वाट एरव्हीच्या तर्कशुद्ध कथानकात असते तशी नाही. किंबहुना एरव्हीचं पारंपारिक कथानक सुद्धा इथे अस्तितवात नाही. दोन ओळीत जर हे कथानक तुम्हाला सांगितलं तर ते अगदीच बालिश आणि निरर्थक वाटेल. मात्र हा सिनेमा पाहताना कथानक दुय्यम ठरतं. सिनेमातून आपला होणारा भावनानुभव अधिक महत्वाचा आहे. या सिनेमात जर गुंग होऊ शकलो तर सिनेमा अनेकदा हसवतो आणि चांगल्या अर्थी गोंधळवून लावतो.
- ‘अब्सर्ड’ या शब्दाचा गुगल वर येणारा अर्थ ‘अनरिजनेबल’, ‘इललॉजिकल’ इत्यादी हा आहे. म्हणजेच एखादा सिनेमा ‘अब्सर्ड’ आहे असं म्हटलं तर त्यापासून तर्क जपण्याच्या अपेक्षा असू नयेत. अब्सर्डपणा एखाद्या ब्लॅक कॉमेडी किंवा सटायर पेक्षा काहीसा सारखा असला तरी वेगळा असतो. सटायरमध्ये प्रत्येक गोष्टीला विशिष्ट अर्थ असतो, अब्सर्डपणात काही गोष्टींचा अर्थ लागतो (जो प्रत्येकाचा वेगळा असू शकतो) आणि काहींचा नाही लागत. या खेळात रस निर्माण झाला तर आपलं मनोरंजन नक्कीच होतं.
- सर्व कलाकार त्यांच्या परीने त्यांना दिलेली पात्र सामर्थ्याने उभी करतात. अगदी एकाच सीनमध्ये दिसलेला कलाकारही त्याचं काम उत्तम करून जातो. हा सिनेमा बनवणारी आणि त्यात काम करणारी हि सगळी तरुण मंडळी नाटकातल्या शिस्तीत तयार झालेली असल्याने कदाचित त्यांच्या कामात नवेपण जाणवला तरी नवखेपणा अजिबात जाणवत नाही. हे दिग्दर्शक म्हणून आलोक राजवाडे याचं सर्वात मोठं यश आहे.
- सिनेमाचा मूळ विषय तरुणांच्या लैंगिक वंचितपणाशी निगडीत आहे. मात्र या विषयासोबतच एखाद्या तरुणाच्या आयुष्यात इत्तर अनेक गोंधळून टाकणाऱ्या गोष्टी घडत असतात. त्यात मिसळलेला ‘अब्सर्डपणा’ याने सिनेमाचा एकूण माहोल जो तयार होतो तो या पिढीतल्या तरुणांना रिलेट होणारा आहे असं म्हणता येईल. एखादी ‘बॅड ट्रीप’ लागते तेव्हा अवतीभवतीचं जग कसं अस्पष्ट वाटू लागतं तसा अनुभव हा सिनेमा देतो.
- सिनेमातली मुख्य पात्र आपल्यासमोर तुकड्या तुकड्यात उभी केली जातात. त्यांच्याबद्दल सहानुभूती किंवा इत्तर काही तीव्र भावना निर्माण होतील अशी सोय या सिनेमात नाही. आणि त्कया पात्दारांच्चिया एकमेकांशी असलेली नात्तयांमध्ये सुद्धा आपण फार गुंतत नाही. हे जाणीवपूर्वक केलेलं प्रयोजन असावं पण तरी त्यामुळे त्या पात्रांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना काहीश्या दुरूनच आपण पाहत राहतो.
- सिनेमाचं कथानक ‘नॉन लिनिअर’ पद्धतीने उलगडत जातं. हे प्रयोजन खरंतर एका विशिष्ट पात्रासाठी केलेलं आहे. पण ते तसं न करता त्या पात्राचं सिनेमात असणं तुकड्या तुकड्यात जर आलं असतं आणि कथानक लिनिअर पद्तधतीने उलगडललं असतं तर अधिक गुंतवणूक प्रेक्षकांची झाली असती आणि शेवटाला जेव्हा ते पात्र मुख्य घटनाक्रमात आणलं जातं तेव्हा ते जबरदस्तीने आणलं आहे असं वाटलं नसतं.
- वरच्या मुद्द्याला धरूनच, अखेर जबरदस्तीने त्या पात्राचं येणं खरंतर सामाजिक संदेश थेट पद्धतीने देता यावा यासाठी केलेलं प्रयोजन आहे. साधारणतः एखद्या ‘अब्सर्ड’ सिनेमात समाजिक संदेश दिला जाणं अपेक्षित नसतं, मात्र तो देऊच नये असाही नियम नाही. तो कसा द्यावा या बद्दल नक्कीच चर्चा होऊ शकते. इथे तो अधिक चातुर्याने देता आला असता जो सिनेमा संपल्यावर आपल्याला विचार करायला लावील.
The post अश्लील उद्योग मित्रमंडळ रिव्ह्यू: जणू एखादी न विसरता येणारी बीटी (बॅड ट्रीप)! appeared first